धुळे- सत्ताधारी शिवसेनेतील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकिय चर्चांना पेव फुटले आहेत. विशेष म्हणजे, गुलाबराव पाटलांनी मुंबईहून जळगावपर्यंत एकाच डब्यात पवारांसोबत प्रवास केला. त्यात त्यांच्यात राज्यातील राजकीय घटनाक्रमासह विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अंमळनेर येथे शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुंबई येथून राजधानी एक्सप्रेसने गुरुवारी जळगावला आले. त्यांच्यासोबत मुंबई येथून मंत्री गुलाबराव पाटील, तसेच पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील जळगावला आले. या तिन्ही नेत्यांनी एकाच रेल्वेने एकाच डब्यात बसून वेगवेगळ्या मुद्यांवर सांगोपांग चर्चा करत जळगाव गाठल्याने राजकीय गोटात खमंग चर्चा रंगली आहे.
पाटील व पवार यांच्यातील चर्चेचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. चिमणराव पाटील व पवार हेही एकमेकांशी संवाद साधत असल्याचे फोटोत दिसत आहे. सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची ही भेटाभेट झाल्यामुळे जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
पत्रकारांनी यासंबंधी गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी राजकीय मुद्दे वगळता इतर विषयांवर चर्चा झाली. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला चांगलेच ठरणार आहे, असेही त्यांनी म्हटले.