कोलकाता(दि. 24) – डेव्हीड मिलर व कर्णधार हार्दिक पंड्या यांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर गुजरातने या स्पर्धेत पदार्पणातच अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला.
Congratulations to the @gujarat_titans as they march into the Final in their maiden IPL season! 👏 👏
Stunning performance by @hardikpandya7 & Co to beat #RR by 7⃣ wickets in Qualifier 1 at the Eden Gardens, Kolkata. 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/yhpj77nobA
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर व यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा ट्रेन्ट बोल्टच्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर शुभमन गिलने मॅथ्यू वेडच्या साथीत अर्धशतकी भागीदारी केली. गिल वेडच्या चुकीच्या कॉलवर धावबाद झाला. त्याने आपल्या 35 धावांच्या खेळीत 21 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 1 षटकार फटकावला. पाठोपाठ वेडही ओबेद मकायच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात 35 धावांवर परतला. या खेळीत त्याने 30 चेंडूत 6 चौकार मारले. त्यानंतर मात्र, कर्णधार पंड्याला साथ देत मिलरने चौथ्या गड्यासाठी अखंडीत शतकी भागीदारी केली.
दरम्यान, मिलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या षटकांत 6 चेंडूत 16 धावांची गरज असताना मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या या षटकांत लागोपाठच्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार फटकावले व संघाचा विजय साकार केला. मिलर 38 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करत 68 धावांवर नाबाद राहिला. पंड्याने 27 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ट्रेन्ट बोल्ट व ओबेद मकॉय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सलामीवीर जोस बटलरने केलेल्या 89 धावांच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल अपयशी ठरला. त्यानंतर मात्र जोस बटलरने आपल्याला सूर गवसल्याचे सिद्ध करणारी खेळी केली. त्याने कर्णधार सॅमसनच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. सॅमसनने 26 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली.
सॅमसन परतल्यावर बटलरने देवदत्त पडीक्कलच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले.
पडीक्कल 28 धावांवर त्रिफळाबाद झाला. त्याने या खेळीत 20 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावले. दरम्यान, बटलरने आपले अर्धशतक पूर्ण करत शतकाकडे कूच केली. मात्र, तोपर्यंत षटके संपत आली होती व अखेर तो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेरच्या षटकात 89 धावांवर बाद झाला व त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याने आपल्या खेळीत 56 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 2 षटकार अशी आतषबाजी केली. गुजरातकडून हार्दिक पंड्या, रवीश्रीनिवासन साई किशोर, महंमद शमी व यश दयाळ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 6 बाद 188 धावा. (जोस बटलर 89, संजू सॅमसन 47, देवदत्त पडिक्कल 28, हार्दिक पंड्या 1-14, रवीश्रीनिवासन साई किशोर 1-43, महंमद शमी 1-43, यश दयाळ 1-46). गुजरात टायटन्स – 19.3 षटकांत 3 बाद 191 धावा. (शुभमन गिल 35, मॅथ्यु वेड 35, डेव्हीड मिलर नाबाद 68, हार्दिक पंड्या नाबाद 40, ट्रेन्ट बोल्ट 1-38, ओबेद मकॉय 1-40).