कपडे शिवणाऱ्या कारागीराकडून झालेली चूकसुद्धा “फॅशन’ म्हणून खपून जाण्याचा एक काळ होता. नावं ठेवणाऱ्यांचा एरियासुद्धा त्यावेळी मर्यादित होता. शिवाय “फॅशन’सुद्धा प्रामुख्यानं कपडे, पादत्राणं, टोप्या वगैरेंपुरती मर्यादित होती. सोशल मीडियानं जग जवळ आणलं आणि “फॅशन’चा जमाना इतिहासजमा होऊन “ट्रेन्ड’चा जमाना सुरू झाला. “ट्रेन्ड’ हा “फॅशन’सारखा संकुचित शब्द नसून तो सर्वव्यापी आहे.
वास्तव काय आहे? आवश्यक काय आहे? धोकादायक काय आहे? साहस कशाला म्हणायचं आणि मूर्खपणा कशाला म्हणायचं? यापैकी एकही प्रश्न डोक्यात येऊ न देता एकमेकांचं अंधानुकरण करायचं आणि सगळ्यांनी मिळून खड्ड्यात जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा; शिवाय त्यात कशी गंमत आहे हे एकमेकांना सांगत बसायचं असे एक से एक भन्नाट “ट्रेन्ड’ जगाच्या पाठीवर सातत्यानं येत-जात असतात. “अमकं चॅलेंज,’ “तमकं चॅलेंज’ म्हणून ते प्रचंड लोकप्रिय होतात. काही ट्रेन्ड धोकादायक नसतात; पण केवळ निरुद्योगी मंडळींनीच करावेत इतके मूर्खपणाचे असतात.
उदाहरणार्थ, बाटलीचं झाकण पायानं उघडून दाखवणं. टोटल निरर्थक! परंतु तितकंच निरर्थक असलेलं बर्फानं भरलेली बादली डोक्यावर उपडी करून घेण्याचं चॅलेंज भलतंच गाजलं. कारण ऍलन मस्क, बिल गेट्स वगैरे भल्याभल्यांनी ते स्वीकारलं. अशा गोष्टी किमान “नॉनसेन्स’ म्हणून सोडून तरी देता येतात; पण जीवावर बेतणारी “चॅलेंज’ सुरू होतात, तेव्हा धडकी भरणारच!
सध्या “मुशरी ट्रेन्ड’ नावाचा एक प्रकार तुफान हिट झालाय. हे “चॅलेंज’ पूर्ण करताना काहीजणांनी हाडं गमावलीत, तर काहींना खोलवर जखमा झाल्यात. पण “चॅलेंज’ स्वीकारण्याची हौस काही संपत नाहीये. हा “ट्रेन्ड’ फ्रान्समधून सुरू झाल्याचं सांगितलं जातंय. यात माणूस अशा उंच ठिकाणी जातो, जी झाडा-झुडपांपासून वरच्या पातळीला असते. तिथून झाडांवर उडी घ्यायची आणि त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करायचा, असं हे चॅलेंज आहे. फ्रान्समध्ये यासाठी साडेतीनशे लोकांचा एक ग्रुपच तयार करण्यात आलाय. तसं पाहायला गेलं, तर हे चॅलेंज “नॉनसेन्स’ प्रकारात मोडणारं नाही.
इतिहासात डोकावल्यास असं दिसून येतं, की एके काळी अमेरिकेला विरोध करण्यासाठी फ्रेंच लोकांनी उंचावरून झाडावर उडी मारायला सुरुवात केली होती. परंतु त्यामागे किमान एक कारण होतं. आता हीच गोष्ट निष्कारण म्हणजे केवळ “ट्रेन्ड’ म्हणून सुरू झालीय. उडी मारणारा “वीर’ त्यानं निवडलेली जागा किती चपखल होती, हेही बऱ्याच वेळा सांगतो. मग बाकीचे त्याचंच अनुकरण करतात. पण हे सगळं “विनाकारण’ सुरू आहे, विनाकारणच लोक स्वतःची हाडं मोडून घेतायत, हे बघून हसावं की रडावं, हासुद्धा पुन्हा ज्याचा-त्याचा प्रश्न!
“मंकी पॉक्स’ नावाच्या माकडांमध्ये असलेला आजार माणसांमध्ये सध्या वेगानं वाढतोय आणि जगभरात या आजाराचे रुग्ण सापडतायत. माकडं म्हणजे माणसांचे पूर्वज. या वास्तवाची आठवण माणसाला असावी म्हणून कदाचित हा आजार पसरला असावा, असं म्हणता येईल. पण उंचावरून झाडावर उडी घ्यायचा हा “आजार’ आला कुठून?
या “ट्रेन्डवाल्यां’कडे पाहून इलाही जमादार यांची गझल तीव्रतेनं आठवली…
ही अचानक माणसांची माकडे झाली कशी?
माणसांच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे..?