Gujarat Titans : कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या संघात गेल्याने आणि मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर गेल्याने गुजरात टायटन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. IPL 2024 च्या लिलावात 3.60 कोटी रुपयांना खरेदी केलेला रॉबिन मिन्झ रस्ते अपघातात जखमी झाला आहे. आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यावर वरचढ ठरत गुजरातने त्याला खरेदी केले होते.
मिन्झ हा मोठा हिटर मानला जातो. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती आणि तो 3.60 कोटी रुपयांना विकला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 वर्षीय मिन्झला ( Robin Minz ) अपघातानंतर सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मिन्झ हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. झारखंडमध्ये तो सुपरबाईक चालवत असताना ही घटना घडली.
रिपोर्टनुसार, त्याची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली. दरम्यान, मिन्झचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मिन्झचे वडील फ्रान्सिस मिन्झ यांनी आपल्या मुलाच्या अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ( Gujarat Titans’ Rs. 3.60 crore buy Robin Minz injured in a superbike accident ) मात्र, रॉबिनला किरकोळ दुखापत झाली असून तो निरीक्षणाखाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, गंभीर असे काही नाही. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत.
रिपोर्टनुसार, अपघातानंतर सुपरबाईकचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी या अपघातादरम्यान मिन्झच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. हार्दिक आणि शमीच्या जाण्याने नुकसान सोसत असलेल्या गुजरात संघाला ही आणखी एक वाईट बातमी मिळाली आहे. रॉबिन कधीपर्यंत फिट (तंदुरुस्त) होईल याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. मात्र, गुजरातच्या चाहत्यांना रॉबिनने आयपीएल खेळावी,अशी गुजरातच्या चाहत्यांची इच्छा असेल. तो भविष्यातील मोठा खेळाडू मानला जात आहे.
22 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात चेपॉकमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. गुजरात टायटन्स अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. हार्दिक मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
रॉबिन मिन्झ झारखंडसाठी अद्याप एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही, तरीही तो खूप मोठी रक्कम मिळवण्यात यशस्वी झाला. आयपीएल लिलावात विकत घेतलेला तो पहिला आदिवासी खेळाडू आहे. सध्या झारखंडची राजधानी रांची येथील नामकुम परिसरात राहणाऱ्या मिन्झने अद्याप रणजी ट्रॉफीमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले नसतानाही झारखंडच्या अंडर-19 आणि अंडर-25 संघांचा तो एक घटक आहे.
गुजरातचा कर्णधार असलेला आणि इंग्लंडविरुद्ध शानदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलने नुकतीच त्याच्या वडिलांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी शुभमनने रांची विमानतळावर फ्रान्सिस मिन्झ( राॅबिनचे वडील) यांची भेट घेतली. रॉबिन मिन्झला भेटण्यासाठी आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी उत्साहित असल्याचे शुभमनने सांगितले होते. वडिलांनी आपल्या मुलासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल फ्रान्सिसचेही त्याने कौतुक केले.