नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातचा पहिला दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते भावनगर, सुरेंद्र नगर आणि वलसाड येथे जाणार असून तेथे त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
गेल्याच दोनच दिवसांपूर्वी मोदींनी गुजरातला भेट दिली होती व त्या अगोदर मागच्या आठवड्यात त्यांनी राज्यात काही मोठ्या प्रकल्पांचे अनावरणही केले होते. रविवार राज्याच्या मोरबी येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 134 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोदींनी दुर्घटना स्थळाला आणि रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींचीही भेट घेतली होती.
1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदार, 8 डिसेंबरला निकाल
बहुचर्चित गुजरात 15व्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यात एक आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबर रोजी लागेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. येथे 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान केले जाईल. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी 8 डिसेंबर रोजी लागणार आहे. 14 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर अशी आहे.
भाजपकडून चित्रा वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी, तर पंकजा मुंडेंना बीडमध्ये धक्का https://t.co/oWeTxRwBQS
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 3, 2022
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये एकूण 4.90 कोटी मतदार आहेत. यात दोन कोटी 53 लाख पुरूष आणि दोन कोटी 37 लाख महिला आहेत. तृतियपंथी मतदारांची संख्या 1417 आहे. तीन लाख 24 मतदार पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. 51782 मतदान केंद्र असून 182 मॉडल पोलिंग स्टेशन असतील. 50 टक्के मतदान केंद्राचे लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे. तर, 33 पोलिंग बुथवर युवा पोलिंग टीम असेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. 182 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 92चा आकडा गाठावा लागणार आहे. 13 मतदार संघ अनुसूचित जाती आणि 27 मतदारसंघ अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत.
भाजप 1995 पासून गुजरातच्या सत्तेवर काबीज आहे. 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. कॉग्रेसचे 77 आमदार निवडून आले होते. मात्र, पुढे चालून त्यातील अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या कॉग्रेसची संख्या 62 एवढी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षालाही एका जागेवर यश मिळाले होते. बीटीपी या पक्षाचे दोन आमदार आहेत. तर पाच जागा रिक्त आहेत.
भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत. तर गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षानं एन्ट्री घेतली असून सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.