पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वडगावशेरी विधानसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातील मरगळ दूर झालेली नाही. निवडणुकीचे वातावरण आणखी तापलेले नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गृहीत धरण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊनच काम करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यांची नाराजीही दूर करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे.
पूर्वी बोपोडी विधानसभा मतदार संघात वडगावशेरीमधील मतदार संघाचा भाग समाविष्ट होता. यात काँग्रेसचे प्राबल्य अधिक होते. त्यावरच चंद्रकांत छाजेड, रामभाऊ मोझे हे आमदार झाले होते. सुरेश कलमाडी, विठ्ठल तुपे यांना खासदार बनविण्यात हा मतदार संघ महत्त्वाचा ठरला होता.
वडगावशेरी या स्वतंत्र विधानसभा मतदार संघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पक्षाचे प्राबल्य बदलत गेले. कायमस्वरुपी कोणत्याही एकाच राजकीय पक्षाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघ राहिलेला नाही. आमदार, नगरसेवक, महापालिकेतील महत्त्वाची पदे उपभोगायला मिळालेली असतानाही संबंधितांना स्वार्थासाठी पक्षनिष्ठा बाजूला सारत एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या.
सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू पठारे, २०१४ मध्ये भाजपचे जगदीश मुळीक, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. या मतदार संघात आमदार सलग दोनदा निवडून येत नाही, हा या मतदार संघाचा इतिहास आहे. लोकप्रतिनिधीकडून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जात नसल्याने नाराजीचा सूरही कायमच आहे.
आता पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. या दोघांच्यात रंगतदार लढत होणार आहे. झोपडपट्या व सोसायट्यांमधील मतदान हे निर्णायकच ठरणार आहे.
भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे लोकसभा निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक होते. मात्र, त्यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांमधील नाराजीही अद्याप कायमच आहे. या मतदार संघातील आमदार सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सहभागी झालेले आहेत.
मात्र, या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार यांच्या गटाला मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग जास्त आहे. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना घेता येणार आहे. रिपाइंचा आठवले गटही नाराज आहे. मात्र तरीही कोणाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रचार करतात ही बाबही महत्वाची ठरणार आहे.
पुणे लोकसभा मतदार संघात २० लाख ३ हजार ३१६ मतदार आहेत. यात सर्वाधिक मतदार संख्या ही वडगावशेरी विधानसभा मतदार संघात ४ लाख ५२ हजार ६२८ एवढी आहे. यामुळे हा मतदार संघ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मताधिक्य मिळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा लागणार आहे. येथील मतदार जागरूक असून, तो कोणाच्या सांगण्यावरुन व दबावाखाली मतदान करणार नाही ही वस्तुस्थिती आहे.
मतदार संघातील समाविष्ट भाग
म्हस्केवस्ती, कळस, गणेशनगर, कुसमाडेवस्ती, माळवाडी, विश्रांतवाडी, भीमनगर, टिंगरेनगर, विद्यानगर, बर्मा सेल, धानोरी, परांडेनगर, मुंजाबावस्ती, भैरवनगर, गोकुळनगर, आनंद पार्क, साठे वस्ती, लोहगाव, ख़ेसे पार्क, खांदवेनगर, फुलेनगर, येरवडा, नागपूरचाळ, महाराष्ट्र् हौसिंग बोर्ड, शांतीनगर, प्रतीकनगर, लक्ष्मीनगर, जयजवाननगर, त्रिदलनगर, राजीव गांधीनगर, माजी सैनिक नगर, विमाननगर, रामवाडी, कल्याणीनगर, नगररोड, चंदननगर, वडगावशेरी, सोमनाथनगर, खराडी.
बापटांना ५६ हजारांचे मताधिक्य
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदार ४ लाख ४४ हजार ६७१ होते. त्यातील २ लाख ६ हजार १६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात भाजपच्या गिरीश बापट यांना १ लाख १७ हजार ६६४ म्हणजेच ५७ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसच्या मोहन जोशी यांना ६० हजार ८४३ मते मिळाली होती. बापट यांना ५६ हजार८८१ एवढे मताधिक्य वडगावशेरी विधानसभा मतदार संघात मिळाले होते.
२०२४ मधील मतदार सद्यस्थिती
एकुण मतदार – ४,५२,६२८
पुरुष – २,३५,३२२
महिला – २,१७, २०५
तृतीयपंथी – १०१