पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यात मागील दोन वर्षांपासून नवीन वाहन खरेदी वाढली असून, 2023-24 आर्थिक वर्षात जवळपास तीन लाख वाहन खरेदी झाली आहे. यंदा तब्बल दोन लाख ९५ हजार 230 वाहने खरेदी झाल्याचे प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 21 हजारांनी वाहन खरेदी वाढली आहे., त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकीसह कॅब आणि रिक्षा खरेदीचे प्रमाण अधिक आहे.
पुणे शहर आणि जिल्हा दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात सध्या ३४ लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत. त्यामध्ये दुचाकींचे सर्वाधिक प्रमाण आहे. करोना काळ आणि त्यानंतरचे काही महिने वाहन खरेदीला काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, २०२२ मध्ये करोनाचे निर्बंध हटल्यानंतर वाहन खरेदीचा वेग वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) शहरात दोन लाख ७४ वाहनांची खरेदी झाली. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन लाख ९५ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे आरटीओच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे.
शहरात २०२३-२४ मध्ये विक्री झालेल्या वाहनांची माहिती (कंसात मागील वर्षीची वाहन विक्री)
विक्री झालेली एकूण वाहने -२ लाख ९५ हजार २३० (2 लाख 74 हजार 906)
दुचाकी- एक लाख ८३ हजार ९५९ (1 लाख 74 हजार 647)
कार- ७० हजार ४४७ (69 हजार 855)
कॅब- ९ हजार ७४६ (3 हजार 624)
तीन चाकी प्रवासी वाहन- १३ हजार १५४ (9 हजार 54)
मालवाहू वाहने- १२ हजार ९९० (12 हजार 884)
बस – 1 हजार 612 (897)
ई-वाहन खरेदीत किंचित वाढ
शहरात ई-वाहन खरेदीमध्ये यंदा किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकी, चारचाही आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाली आहे. २०२२-२३ आर्थिक वर्षात पुण्यात ३० हजार ६५३ ई-वाहने खरेदी करण्यात आली होती. २०२३-२४ मध्ये हा आकडा हा ३२ हजार ८३६ झाला आहे. त्यामध्ये ई-बाइक २९ हजार २८५, तर कार खरेदी 2 हजार 290 इतकी झाली आहे. मालवाहतुकीसाठी देखील ई-वाहने खरेदीचे प्रमाण वाढत आहे.