Gold shopping On Gudhi Padwa| – जगातील अनिश्चिततेची स्थिती..अस्थिर शेअर बाजार..आगामी लग्नसराई…सुवर्ण अलंकाराची क्रेझ..सोने हेच सुरक्षित आणि भरवश्याचे गुंतवणुकीचे माध्यम आहे. त्यामुळे “गोल्ड इज गोल्ड’ म्हणत पुणेकरांनी मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुवर्ण खरेदीचा आनंद लुटला.
साडेतीन मुहुर्तापैकी संपूर्ण एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी सुवर्ण खरेदीची परंपरा आहे. यानुसार मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांनी शहरातील विविध सराफांच्या पेढ्यांवर सुवर्ण खरेदीसाठी गर्दी केली होती. मागील काही दिवसांत सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
सोन्याने प्रतितोळा ७२ हजार रुपये भाव गाठला आहे. मात्र, या महागाईचा कसलाही परिणाम विक्रीवर झाला नाही. नागरिकांनी नेहमीप्रमाणे सोन्याची खरेदी केल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. अलीकडच्या काळात पुरूषांनाही सुवर्ण अलंकाराचे आकर्षक निर्माण झाले आहे. अंगावर सोने असणे प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यामुळे स्त्रीयांबरोबर पुरूषांकडून मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यात येत आहे. त्याबरोबरच समाजातील काही लोक सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. अशा लोकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.
सोन्यात वर्षभरात २१ टक्के परतावा Gold shopping On Gudhi Padwa|
मागील वर्षी गुढीपाडव्याला सोन्याचा भाव ५९ हजार रुपये प्रती तोळा होता. तो आता ७२ हजार रुपयापर्यंत पोहोचला आहे. एका वर्षात सोन्याच्या भावात जवळपास २१ टक्के वाढ झाली आहे. तर, मागील दीड महिन्यांत तोळ्यामागे तब्बल १० हजार रुपये वाढ झाली आहे. यावरून सोने खरेदीतून नागरिकांना चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याला चांगली मागणी आहे. सोन्याचे भाव वाढले आहेत, तरीही खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. लग्नसराईची खरेदी लोकांकडून करण्यात येत आहे. दागिन्यांना सर्वाधिक मागणी आहे. वेढणीचीही खरेदी करण्यात येत आहे. वास्तुपाल रांका, रांका ज्वेलर्स
सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळे लोकांचा भर नाजूक आणि कमी वजनाचे दागिने खरेदी करण्याकडे आहे. डायमंडलाही चांगली मागणी आहे. नियमितप्रमाणे मुहुर्तावर वेढणीचीही खरेदी करण्यात येत आहे.- सिद्धार्थ शहा, चंदुकाका सराफ ज्वेलर्स
गुढीपाडव्याला शुभ मुहुर्तावर नागरिकांचे सुवर्ण खरेदीचे नियोजन असते. ठराविक रकमेची खरेदी करत असतात. त्याप्रमाणे यंदाही ते सोने ते खरेदी करत आहेत. लग्नसराई आणि लगेच घालता येत असल्यामुळे तयार दागिन्यांना जास्त मागणी आहे. – अजितकाका गाडगीळ, पीएनजी अॅंड सन्स
सोने खरेदीकडे लोक वळले आहेत. “भाव कमी होतील, मग घेऊ’ अशी पूर्वीप्रमाणे लोकांची मानसिकता राहिली नाही. लोकांना घ्यायचे आहे. सोन्याचे भाव वाढतच राहणार आहेत, ही लोकांची भावना आहे. मंगळसूत्र, चेन आणि नेकलेस जास्त मागणी आहे. मुहूर्त वेढणी आणि सोन्याच्या नाण्याची खरेदी सुरू आहे.- अतुल अष्टेकर, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स)
दिवसेंदिवस सोन्याच्या भावात वाढ होत आहे. गुंतवणूक म्हणून लोक सोन्याकडे पाहात आहेत. त्यांना चांगला परतावा मिळत आहे. आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याच्या शक्यतेने नागरिकांकडून खरेदी करण्यात येत आहे. लग्नसराईमुळे दागिने आणि मुहुर्तामुळे चोख सोने खरेदी करण्यात येत आहे. – सौरभ गाडगीळ (पीएनजी ज्वेलर्स)
हेही वाचा:
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’नंतर अंकिता लोखंडे दिसणार नव्या भूमिकेत; समोर आला अभिनेत्रीचा खास लुक