पुणे – पुण्यातील गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनियरिंगच्या (जिजिआयएम) आव्हान निर्माण उडान या शालेय विद्यार्थ्यांच्या साहसी अभ्यासक्रमाच्या सहाव्या वर्षाची येत्या रविवारी सुरुवात करण्यात येत आहे.
करोनाचा धोका व लॉकडाऊनमुळे भटकंती – ट्रेकिंग- गिर्यारोहणावर तात्पुरती बंदी असल्याने साहसी अभ्यासक्रमात परिस्थितीनुरूप अभिनव बदल घडवून आणले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊनच यावर्षीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
गेली काही महिने करोनाचा धोका व त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शारीरिक व मानसिक तंदुरस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ट्रेकिंग, भटकंती व गिर्यारोहणातून मिळणाऱ्या शिक्षणातून निरोगी व तंदुरस्त कसे राहावे, याचे धडे मिळतात. निसर्गाच्या सान्निध्यात, साहस-धाडस करताना येणारे अनुभव सकारात्मकता वाढवण्यास मदत करतात. या सर्वांचा विचार करूनच गेली 3 हून अधिक महिने घरात अडकून पडलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी यावर्षीचे साहसी उपक्रम आयोजिले आहेत.
येत्या रविवारी, 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता 10 ते 16 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यात येईल.