नाशिक – अभिनेता अक्षय कुमारने नुकताच केलेला नाशिक दौरा त्याला महागात पडण्याची शक्यता आहे. एका खासगी दौऱ्यांतर्गत अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकला आला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मात्र अक्षयकुमारच्या या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे.
या प्रकरणी मंत्री छगन भुजबळांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी परवानगी कोणी दिली? हॉटेल्स बंद असताना अक्षयसाठी रिसोर्ट उघडे कसे झाले? मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री वाहनातून फिरत असताना, अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. शहरात पोलिसांचा हद्दीचा वाद सुरू असताना ग्रामीण भागात शहर पोलिसांचे एसकोर्ट कसे ? असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अक्षय कुमार एक दिवस नाशिक मुक्कामी होता. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अक्षयच्या येण्याचं कारण स्पष्ट झाले नसले तरी काही वैद्यकीय कारणांनिमित्ताने आल्याची माहिती समजते.