नवी दिल्ली – बॅंकांतील कर्ज आणि ठेवीवरील व्याजदर कमी होत असताना अल्पबचतीवरील व्याजदरात तूर्त कपात न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठीचे व्याजदर जाहीर झाले असून त्यामध्ये घट करण्यात आलेली नाही. पोस्टातील बचत खात्यावर चार टक्के व्याजदर मिळणार आहे. त्याचबरोबर पोस्टात ठेवलेल्या एक ते पाच वर्षे कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर साडेपाच टक्के ते 6.7 टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वरील व्याजदर 6.8 टक्के राहील. किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9 टक्के राहणार आहे. सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याजदर 7.6 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. 2016 पासून अल्पबचतीवरील व्याजदरात प्रत्येक तीन महिन्यांत बदल केले जातात. मात्र, हे व्याजदर असेच दीर्घकाळ जास्त पातळीवर राहणार नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांना नव्या गुंतवणूक संधी शोधाव्या लागणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.