Manipur : मणिपूरचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री खेमचंद युमनम यांच्यावर त्यांच्या निवासस्थानाजवळ हँडग्रेनेडने (Grenade Attack) हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानासह दोन जण जखमी झाले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पश्चिम इंफाळ जिल्ह्यातील युम्नाम लीकई येथे हा हल्ला( Grenade Attack) झाला. सीआरपीएफचा जवान मंत्र्यांच्या निवासस्थानी तैनात होता. त्याच्या एका हातावर गंभीर जखम झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत तरी कोणत्याही संघटनांकडून करण्यात आलेला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ही घटना घडवून आणल्याचे म्हटले जात आहे. हा ग्रेनेड (Grenade Attack) मंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य गेटपासून काही मीटर अंतरावर पडला. हल्ल्यात जखमी झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव दिनेश चंद्र दास असे असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. तसेच या हल्ल्यात एक महिलाही जखमी झाली असून तिच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. युमनम हे राज्य सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री आहेत. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन हल्ल्याचा निषेध केला.
खेमचंद हे मणिपूरच्या त्या मंत्र्यांपैकी एक आहेत ज्यांनी दिल्लीत मणिपूर तरुणांच्या प्रतिनिधींसोबत चार तास चाललेल्या बैठकीत मेईतेई आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाग घेतला. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या आसपासच्या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. समाजकल्याण मंत्री नेमचा किपगेन यांनी सभापतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तिची सुरक्षा पुरेशी नसल्याने ती विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाही.