पुणे – फुले दाम्पत्याने भिडे वाड्यात १७६ वर्षांपूर्वी मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याची मुहूर्तमेढ एक जानेवारी १८४८ रोजी रोवली. या त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी माळी महासंघातर्फे दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) अशी फुले दांपत्य सन्मान महारॅली काढण्यात आली होती.
यावेळी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण भाऊ तिखे, माजी आमदार कमल ढोले पाटील, पुणे शहर अध्यक्ष दीपक जगताप, आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर वैशाली बनकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत मोरे, माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर सरचिटणीस गिरीष झगडे, पुणे शहर उपाध्यक्ष रवी सहाणे, पुणे शहर उपाध्यक्ष सचिन शिवरकर, पुणे शहर खजिनदार राजेंद्र लडकत, माळी महासंघाचे विश्वस्त संतोष जमधडे, कसबा विभाग प्रमुख आरती सहाने, कात्रज विभाग प्रमुख सीमा शिवरकर, राध्येशाम चरवर, महिला प्रदेश सचिव रिमा लडकत आणि वानवडी विभाग प्रमुख वैशाली रासकर, महिला प्रदेशाध्यक्ष शुभांगी लोंढे, पुणे शहर महिला अध्यक्ष स्मिता लडकत, पुणे शहरचे युवा कार्याध्यक्ष प्रज्वल बनकर आदी उपस्थित होते.
दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा येथून या रॅलीला प्रारंभ झाला. यानंतर पुढे शिवाजी रोड मार्गे फडगेट पोलीस चौकी येथून डाव्या बाजूने गंजपेठ पोलीस चौकी आणि महाराणा प्रताप रोडने गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा अर्थात समता भूमी येथे रॅली आली. या ठिकाणी सर्व फुले प्रेमींनी फुले दाम्पत्याला अभिवादन केले. या महारॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले स्मारक येथे झाला.
नायगाचे पथक आकर्षण
या महारॅलीत नायगाव येथील सावित्रीच्या लेकींचे ढोल पथक, परिंचे येथील गावकऱ्यांचे ढोल पथक, ठाणे आणि पवना डॅम येथील ढोल पथके सहभागी झाले होते. रॅली मार्गावर भव्य रांगोळी, सुशोभित रथ, महिलांचा आणि फुलेप्रेमी समाज बांधवांचा सहभाग हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले.