पाबळ -येथील पद्ममणी जैन तीर्थपेढी व दानशूर 90 वर्षीय जैन भाविक श्रीमती प्रेम धनराजजी डांगी यांच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिबिराचे उद्घाटन डांगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 30 जणांची तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले.
यावेळी जैन ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई नागोरी, सुनील राठोड, विश्वस्त राजेंद्र शहा, सतीश गांधी, जयेश शहा, हर्षद गांधी, केतन शहा, डांगी परिवार व ग्रामस्थ व ठुसे रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, जैन ट्रस्टच्या माध्यमातून गेली दहा वर्षे शिबिराचे आयोजन करण्यात येत होते. दोन वर्षांपासून काही अपरिहार्य कारणास्तव ही योजना बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, श्रीमती प्रेम डांगी यांच्या दातृत्वातून ही योजना पुन्हा अस्तित्वात आली आहे. यापुढेही ही योजना सुरू ठेवण्यासाठी नियोजन झाले तर सामुदायिक विवाहासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष भरत नागोरी यांनी दिली.
दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा
शासनाकडून मिळणारी मदत गोठवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. यावर्षी संपूर्ण मदतच शासनाकडून बंद करण्यात आल्याची माहिती मिळत असल्याने व मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियाही शासनाकडून (ससूनव्यतिरिक्त) मोफत होत नसल्याची माहिती मिळत आहे. लासरू व इतर आजारांसाठी मोठ्या प्रमाणात होणारा खर्च गोरगरीब रुग्णांना दृष्टिहीन ठेवण्यात कारणीभूत ठरत आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.