पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “गट 3′ व “गट 4′ मधील शिक्षकेतर सेवकांना विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांसाठी तब्बल 50 टक्के शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या शिक्षकेतर सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याद्वारे सेवकांना कमी शुल्कात शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
यंदाच्या वर्षापासून बहि:स्थ अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करून मुक्त अध्ययन प्रशाळा अर्थात दूरशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया राबविली. पहिल्याच वर्षी प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. या अभ्यासक्रमासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांच्या शुल्कात 50 टक्के सवलत मिळावी, असा प्रस्ताव मुक्त अध्ययन प्रशाळेमार्फत व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली आहे.
दूरशिक्षणच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या व्यवस्थापन शुल्कापैकी 50 टक्के शुल्क सवलत देण्यात येणार आहे. तसेच शुल्क सवलत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लागू राहणार नाही. तसेच, विद्यापीठातील वर्ग 3 व वर्ग 4 मधील शासनमान्य पदांवरील व विद्यापीठ निधीतील पूर्ववेळ कार्यरत शिक्षकेतर सेवकांना ही सवलत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रवेशित अभ्यासक्रमासाठी शुल्क सवलत मिळण्यासाठी प्रवेश अर्जासोबत पूर्वपरवानगीचे पत्र व कर्मचारी ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली.
दूरशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या शिक्षकेतर सेवकांना निम्मे शुल्क कमी करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यानुसार अर्जासोबत पूर्वपरवानगी पत्र सादर केलेल्या सेवकांना निम्मे शुल्क कमी केले जाईल.
– प्रा. संजीव सोनवणे, संचालक : मुक्त अध्ययन प्रशाळा