नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इंद्राणीने शीनाचे गुगल अकाउंट मिळवण्यासाठी दोन डॉलर क्रेडिट कार्डद्वारे भरले होते. 17 जून 2012 या दिवशी इंद्राणीने हे पैसे भरले होते अशी साक्ष या प्रकरणातील साक्षीदाराने दिली आहे. शीनाची हत्या झाल्यानंतर तिचे गुगल अकाउंट हे अकाउंट रिकव्हरी टुलकिटद्वारे सुरु करण्यात आले. शीनाच्या गुगल अकाउंटवरुन इंद्राणीने काही लोकांना इमेल केले होते. शीना जिवंत आहे हे इंद्राणीला भासवायचे होते म्हणून तिने हे केल्याचेही या साक्षीदाराने न्यायालयाने सांगितले.
इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोराच्या हत्येच्या आरोपाखाली ऑगस्ट मध्येच अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून इंद्राणी मुखर्जी भायखळा येथील तुरुंगात आहे. या प्रकरणी जेव्हा कोर्टात सुनावणी घेण्यात आली तेव्हा शीनाचे गुगल अकाउंट सुरु ठेवण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने 2 डॉलर भरले होते हे साक्षीदाराने सांगितले. ज्या साक्षीदाराने ही साक्ष दिली तो वरळी येथील एचडीएफसी बॅंक शाखेचा ब्रांच मॅनेजर आहे. त्याने इंद्राणीच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स देताना इंद्राणी मुखर्जीने दोन डॉलर गुगलला कशासाठी भरले ते सांगितले. मुंबईच्या एका वर्तमानपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
शीना बोराची हत्या 2012 मध्ये करण्यात आली. इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यावर शीनाची हत्या करण्याचा आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. 2015 मध्ये शामवर रायला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशी दरम्यान या हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा खुलासा झाला. हा सगळा प्रकार पीटर मुखर्जीलाही माहित होता. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली.
शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी आहे हे पीटर मुखर्जीला माहित होते. तसेच पीटरला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा राहुल आणि शीना बोरा यांचे प्रेमसंबंध जुळले आहेत हेदेखील माहित होते. शीना बोराची हत्या झाल्यानंतर सुरुवातीला ती बेपत्ता झाल्याचा बनाव रचण्यात आला. त्यावेळी पीटरने शीना बोराला शोधण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शीना बोरा कुठे आहे ते माहित नाही असे म्हणत त्याने कानावर हात ठेवले. त्यामुळेच या प्रकरणात आधी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय या तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर पीटर मुखर्जीलाही अटक करण्यात आली.