Lalu Prasad Yadav Grandson – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा पुतण्या नागेंद्र यादव यांच्या मुलाने एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रूपसपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तनुज यादव असे लालूंच्या नातवाचे नाव आहे.
ज्या अधिकाऱ्यावर हल्ला झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार आपण नागेंद्र यादव यांचा मुलगा असून लालू यादव यांचा नातू असल्याचे तनुज म्हणाला होता. संबंधित कुटुंबीयांच्या या आरोपानंतर या प्रकरणाला गंभीर वळण प्राप्त झाले आहे. दरम्यान, हल्ल्याच्या या घटनेशी आपल्या दोन्ही मुलांचा काही संबंध नसल्याचे नागेंद्र यादव यांनी म्हटले असून घटना घडली त्यावेळी ते दोघेही तेथे नव्हतेच असा दावाही त्यांनी केला आहे.
उलट लालूंचा पुतण्या असल्यामुळे आम्हालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की तनुज एक ठेकेदार आहे तर माझा दुसरा मुलगा पायलट आहे. एक बिल्डर माझा विरोधक आहे. त्याच्याशी काही कारणांवरून माझा बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. संबंधित बिल्डर आणि अरविंद सिंह नावाचे अधिकारी एकत्र होते.
त्यांचा कोणत्यातरी गोष्टीवरून रंजन नावाच्या व्यक्तीशी वाद झाला. रंजन हा माझा दूरचा नातलग आहे. त्यावरूनच पोलीस माझ्या घरी आले. माझ्या मुलांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आम्ही लालूंच्या कुटुंबातले असल्यामुळे विरोधी पक्षांसोबत आमच्या विरोधात कारस्थान रचले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
अरविंद कुमार सिंह या अधिकाऱ्यावर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांपैकी एकाने त्याचे नाव तनुज असल्याचे म्हटले होते. तसेच आपण लालूंचे नातू असून काय करायचे ते करा अशी धमकी देत अधिकाऱ्याला जबर मारहाण केली. जखमी अधिकाऱ्याला उपचारांसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे.