BWF India Open 2024 : जागतिक क्रमवारीत माजी नंबर वन भारताच्या किदाम्बी श्रीकांतला बुधवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या ली चेउक यियूकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला आणि यासह इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटनमधील त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
जागतिक क्रमवारीत 25व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या ली चेउकविरुद्ध 47 मिनिटांत 22-24, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला. श्रीकांतचा ली चेउकविरुद्धच्या चार सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे.
याशिवाय पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत 50व्या मानांकित सतीश कुमारला जपानच्या तोकुमा ओबायाशीकडून 20-22, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
त्याचवेळी, BWF सुपर 750 स्पर्धेत महिला एकेरीत एकमेव भारतीय आकर्षी कश्यपला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या चेन यू फी हिच्याकडून 21-10, 21-9 असा पराभव पत्करावा लागला. दुसरी मानांकित चायनीज शटलर गत ऑलिम्पिक चॅम्पियन आहे.