पावती फाडण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच हातात काठी घेऊन ठेकेदाराचा कर्मचारी
प्रवेशद्वाराजवळ बांधले श्वान
एसटी स्थानकाच्या आत वाहनतळ आहे. या वाहनतळात नागरिकांनी आपले वाहन पार्क केल्यास पार्किंग शुल्क आकारण्यात येते. परंतु तिथे व्यवसाय होत नसल्याने ठेकेदाराच्या कामगारांनी थेट प्रवेशद्वाराजवळच बस्तान मांडले. टेबल खुर्ची लावून कामगार हातात काठी घेऊन प्रवेशद्वारातच उभे राहिले. एवढेच नव्हे तर प्रवेशद्वाराजवळ नागरिकांना घाबरविण्यासाठी एक मोठे श्वानही बांधण्यात आले होते. आत येणाऱ्या प्रत्येक खासगी वाहनांकडून वसुली करण्याचा हा प्रकार भयानक असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
पिंपरी – वल्लभनगर आगाराच्या प्रवेशद्वारावरच पार्किंग ठेकेदाराचे कामगार हातात काठी घेऊन दादागिरीने अडवितात व जबरदस्तीने वाहनतळाची पावती करण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला. प्रवासी आणि नागरीकच नव्हे तर त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि कर्मचाऱ्यांनादेखील ही दादागिरी सहन करावी लागली. कर्मचाऱ्यांना ठेकेदारांच्या कामगारांना ओळखपत्र दाखवून आत जावे लागत असल्याचे चित्र येथे दिसून आले. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करुन ठेकेदाराच्या कामगारांना तेथून हटवावे लागले. हा प्रकार सोमवारी घडला.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर साहायक अधीक्षकांनी ठेकेदाराच्या कामगारांना प्रवेशद्वाराजवळून आपले बस्तान हटविण्याच्या सूचना केल्या. अखेर त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि पुन्हा “एसटी’ स्थानकांच्या आत येऊन बस्तान मांडले. मात्र, असे काहीच न घडल्याचा आव आणून कामगारांनी ईदच्या सुट्टीचे कारण सांगून सारवासारव केली.
वल्लभनगर येथील “एसटी’ आगारात वाहनतळासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्याने दुसऱ्या व्यक्तीला ठेका दिला आहे. अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवेशद्वाराजवळ थांबविण्याबाबत आगारप्रमुखांना विनंती केली.
आगारात इतर खासगी वाहने आणि अवैध पार्किंगला चाप बसावा, यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार आगारप्रमुख संजय भोसले यांनी एका कर्मचाऱ्याला प्रवेशद्वाराजवळ थांबण्याची मुभा दिली. मात्र, सकाळी ठेकेदाराने संपूर्ण बस्तानच प्रवेशद्वाराजवळ आणून ठेवले. येथे येणाऱ्या सर्व वाहनांना काठी दाखवून अडविण्यात येत होते. आगारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून बळजबरीने पावतीचे पैसे मागण्यात येत होते.
नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या आणि वाहन पार्क न केलेल्या नागरिकांना देखील पावती फाडण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. अखेर एका नागरिकांने त्याची माहिती आगारातील साहायक अधीक्षक पल्लवी पाटील यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी प्रवेशद्वाराजवळ धाव घेतली व तेथून सर्व साहित्य काढण्याच्या सूचना केल्या. ठेकेदाराचे कर्मचारी गाशा गुंडाळून पुन्हा आगारात जाऊन बसले. त्याबाबत वाहनतळावरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, “असे काही घडले नाही. आम्ही ईदची अर्धी सुट्टी घेतली आहे. त्यामुळे वाहनतळ बंद केले आहे’, असे सांगितले.