हुल्लडबाजीला आळा; ऍन्टी गुंडा स्क्वॉडची कामगिरी
पिंपरी – रॅश ड्रायव्हिंग आणि हुल्लडबाजीला आळा बसावा, यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दररोज सायंकाळी वेगवेळ्या ठिकाणी नाकाबंदी करण्यासाठी ऍन्टी गुंडा स्क्वॉडची स्थापना केली. या पथकाने गेल्या 96 दिवसांमध्ये तब्बल 83 हजार 948 वाहनांची तपासणी केली.
महाविद्यालयीन तरुण तसेच इतर काहीजण वेगात वाहने चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात आणतात. तसेच दुचाकीवरील काहीजण हुल्लडबाजी करतात. अशा वाहन चालकांवर जरब बसेल अशी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
यामुळे आयुक्त पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकास दररोज सायंकाळी आपल्या हद्दीतील महत्वाच्या चौकांमध्ये विशेषतः दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 9 मे पासून विविध ठिकाणी नाकाबंदीस सुरवात झाली. नागरिकांना सुरवातीला हा प्रकार त्रासदायक वाटत होता. मात्र काही दिवसातच या नाकाबंदीचा सकारात्मक परिणाम शहरवासियांना दिसू लागला.
सराईत सापडले तपासणीत
पोलिसांनी हद्दीतील ठिकाणे बदलून केलेल्या या वाहन तपासणी मोहिमेत शहरातून तडीपार करण्यात आलेले तब्बल 26 गुंड पोलिसांच्या हाती लागले. कारवाईमध्ये आरडा-ओरडा करीत अडथळा आणणाऱ्या चार जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. रात्रीच्यावेळी दुचाकीवरून आरडा ओरडा करीत रस्त्यावर वाढदिवस करण्याच्या प्रकारालाही यामुळे आळा बसला.
ऑपरेशन ऑल आऊट
पिंपरी -बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये रविवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये 170 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. यासाठी 376 सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी 170 सराईत गुन्हेगार मिळून आले. अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भरत ज्ञानोबा थोरात हा मिळून आला. तसेच खूनी हल्ल्यातील फरार आरोपी संदीप दादू खलसे हा देखील सापडला.