राहुरीत धनगर समाजाचा रास्तारोको

राहुरी विद्यापीठ – धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी पंढरपूर येथे 9 ऑगस्टपासून धनगर समाज बांधव उपोषणास बसले आहेत. मात्र शासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राहुरीत नगर-मनमाड रस्त्यावर धनगर समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच दोन दिवसांत या प्रश्‍नी निर्णय न झाल्यास भाजप, शिवसेना आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, यासाठी पंढरपूर येथे धनगर समाजा बांधव उपोषणास बसले आहेत. मात्र पाच दिवस होऊनही राज्य सरकारने या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे. 2014 ला बारामतीत धनगर समाजाने आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने व उपोषणे चालू होती. त्याकाळात आघाडी सरकारला धनगर समाजाने जेरीस आणले होते. त्यावेळेस विद्यमान मुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला लेखी आश्वासन दिले होते, की आम्हाला सत्तेत बसवा आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, असे जाहीर केले.

परंतु पाच वर्षे होऊनही सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ राहुरीत रास्तारोको करण्यात आला. तसेच सरकारने दोन दिवसांत आरक्षणाचा विषय मार्गी न लावल्यास भाजप व शिवसेना आमदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

ज्ञानेश्वर बाचकर, जिल्हा नियोजन समिती सदस्या वैशालीताई नान्नोर, दत्तात्रय खेडेकर, दत्तात्रय बाचकर, जि. प. सदस्य, धनंजय गाडे, पोपटराव शेंडगे, श्रीकांत बाचकर, भारत मतकर, डॉ. देवकाते, अरुणराव डोंगरे, अर्जुनराव बाचकर, संभाजी पाटील बाचकर, सर्जेराव लाटे, रंगनाथन संजय वडीतके, राहुल बाचकर, राजू वाघ, अप्पासाहेब सरोदे, भागवत झडे, संतोष बोरुडे, कोंडीराम बाचकर, उमेश बाचकर, लिंबाजी बाचकर, रामदास बाचकर, भगवान खेडेकर, संजय गावडे, काका गावडे, दादाभाऊ तमनर, साहेबराव गडदे, ठकाजी बाचकर, बाबासाहेब केसकर, जालिंदर बाचकर आदींसह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.