Gram Panchayat Result : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल समोर येत आहेत. ग्रामपंचायत निकालामध्ये जनतेने भाजप- शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या बाजूने कौल दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही कर्जत जामखेड मतदारसंघात मोठा धक्का बसला असून भाजपने बाजी मारली आहे.
कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी 5 जागा मिळवत भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा आणि अजित पवार गटाकडे तर 1 तर स्थानिक आघाडीला एक जागा मिळाली आहे. या निकालाने आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून भाजपाचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे वर्चस्व कायम राहीले आहे.
बारामतीत अजितदादाच
बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. तालुक्यातील 1 ग्राम पंचायत बिनविरोध झाली होती. तालुक्यात सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी या ग्राम पंचायतीकडे लागले होते. या ठिकाणी अजित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान होते. त्यात आता अजित पवार गटाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.