पुणे – खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच हजारासाठी जरी काम करणाऱ्याचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपीला खडक पोलिसांनी तीन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसांसह अटक केली आहे.
मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नव्या सुरेश लोधा असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द यापुर्वी खडक, मुंढवा व दत्तवाडी पालीस ठाण्यात दुखापत, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा वापर करुन खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, खडक पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडे पेठ परिसरात दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री उशीरा अनिल नावाच्या जरी काम करणाऱ्या कामगाराचा गोळी झाडुन खुन करण्यात आला होता. यानंतर आरोपी श्रीमंत सुवर्ण भारत मित्र मंडळ जवळ थांबलेल्या त्याच्या साथीदारासह टु व्हीलरवर बसुन घाई गडबडीने निघुन गेले होते.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हयातील इतर तिन आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. परंतु गुन्हयातील मुख्य आरोपी खुन करुन फरार होता. लोधा याचा शोध चालू असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम व पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना नवनाथ लोधा ऊर्फ नव्या हा खेड शिवापुर येथे थांबल्याची खबर मिळाली. यानंतर खेड शिवापूर येथे सापळा रचून आरोपीला शस्त्रासह अटक करण्यात आली.
उपायुक्त संदिपसिंह गील, सहायक आयुक्त अशोक धुमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने , पोलीस निरीक्षक संपत राऊत, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, उपनिरीक्षक अजित बेग, अंमलदार हर्षल दुडम, संदिप तळेकर, सागर घाडगे, लखन ढावरे, आशिष चव्हाण, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, रफिक नदाफ, राणी जाधव यांच्या पथकाने केली.