राज्यपालांकडून करोना परिस्थितीचा आढावा

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा !

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच करोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन राज्यातील वाढत चाललेले करोना संक्रमण थांबविण्याबद्दल शासकीय स्तरावर सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

राज्याने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र निजामूद्दीन येथे मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या लोकांमुळे वाढत असलेल्या करोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष जागरुकता ठेवावी. तसेच कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या.

देशात करोनाच्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. राष्ट्रपती देखील नियमितपणे राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. यादृष्टीने राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या व सद्यस्थिती, शासन करीत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साधनांची उपलब्धता, स्थलांतरित कामगार, मजूर व बेघर यांच्यासाठी केलेली निवारा व भोजनाची व्यवस्था, शेतमालाची विक्री होण्याचे दृष्टीने केलेल्या उपाययोजना, मदत कार्यात अशासकीय संस्थांचा सहभाग इत्यादि विषयांचा राज्यपालांनी आढावा घेतला.

दरम्यान, करोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले 30 टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा त्यांनी केली. मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

आरोग्य, स्वच्छता कर्मचारी, पोलीसांना शाबासकी !
करोनाविरुध्द्ध लढ्यात आघाडीवर असलेले डॉक्‍टर्स, नर्सेस, आरोग्यसेवा कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच जीवनावश्‍यक सुविधा पुरविणारे लोक अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तपस्व्याप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.