संभाजी राजांच्या शौर्य स्तंभाची शासकीय पूजा

श्रीगोंदा – छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून, युवकांमध्ये स्वराज्य टिकविण्याची प्रेरणा देणारा उपक्रम म्हणून पेडगाव ते वढू-तुळापूर मार्गावरून ज्योत यात्रा दरवर्षी जाते. यंदा या ज्योत यात्रेत हजारो युवक सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी दरवर्षी पेडगाववरून या ज्योत यात्रेचे प्रस्थान शासकीय पूजनाने होत असते. या वर्षीची शासकीय पूजा श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, श्रीगोंदा तालुका सहकारी संस्था सहायक निबंधक रावसाहेब खेडकर, श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विश्‍वंभर दातीर व पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे साळवे तसेच शासकीय कार्यालयीन सेवकवृंद उपस्थित होते. या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेडगावच्या बहादूरगड किल्ल्यातील छ. संभाजी महाराजांच्या शौर्य स्तंभाचे पूजन पार पडले.

यावेळी श्रीगोंदा तालुक्‍यातील शहीद जवानांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यामध्ये कोळगावचे शहीद जवान श्रीपती नामदेव कलगुंडे, सचिन सावळाराम साके, भाऊसाहेब मारुती तळेकर, चिंभळे येथील शहीद जवान नाना नबाजी काळे, अजनुजचे शहीद जवान मिनीनाथ रघुनाथ गिरमकर व कपील नामदेव गुंड, चांभूर्डी येथील भानुदास पर्वत्ती उदार आणि चांडगाव येथील शहीद जवान मधुकर सखाराम म्हस्के या शहीदांच्या स्मृतींना त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी मशालीची ज्योत शासकीय पूजनाने प्रज्वलित करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या जीवनात त्यांना कोकणातील संगमेश्‍वरला शत्रूने फितुरीने पकडल्यानंतर पेडगावला बहादूगड किल्ल्यावर आणले होते. किल्ल्यात मोगल सम्राट औरंगजेब व हिंदवी स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट झाली होती. 3 एप्रिलला सायंकाळी किल्ल्यात पूजेचा सोहळा छ. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे, पेडगावचे सरपंच भगवान कणसे व पंचायत समिती उपसभापती प्रतिभा गणेश झिटे यांचे उपस्थितीत झाला. यावेळी इंदापूर येथील तानाजी पांडुळे यांचे शंभूचरित्रावर व्याख्यान झाले. रात्री शंभू चरित्रावर भर्तरी भागवत यांचे प्रवचन झाले.

या पूजन सोहळ्यासाठी शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजकुमार पाटील व पोलीस पाटील शिवाजी गिरी गोसावी व विविध शिक्षण संस्थेतून आलेले मान्यवर उपस्थित होते. व्यसनमुक्त संघाचे शहाजी काळे, मारुती शेळके, बाळासो खेडकर, संदीप मोहिते, नीलेश खेडकर, ईश्‍वर जंजीरे, अमोल सायंबर, बाळासो नवले, रत्नाकर हराळ, बाळासाहेब धोत्रे महाराज, दिलीप वडवकर, प्रा. डॉ. नारायण गवळी, नितीन महाराज माने, भाऊसाहेब ठोंबरे, शिवदूर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अनेक कार्यकर्ते व पेडगाव परिसरातील शंभूप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.