विदर्भात चुरशीची लढत…मतदान कमी झाल्याने सत्ताधारी चिंताग्रस्त

मुंबई – लोकसभा निवडणूकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली असली, तरी सरकार विरोधात असलेला रोष पाहता 2014 च्या लोकसभेच्या तुलनेत अपेक्षित मतदान न झाल्याने उमेदवार चिंताग्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूरसह वर्धा, भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघात तीन ते चार टक्‍क्‍यांनी कमी मतदान झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता आहे.

17 व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. गुरुवारी विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात सरासरी 60 ते 62 टक्के मतदानाचा अंदाज वर्तवला आहे. तथापि 2014 च्या निवडणुकीत येथे सरासरी 63.71 टक्के मतदान झाले होते. हे लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत कोणतीही लाट नसल्याचे स्पष्ट दिसते.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, प्रत्येक मतदाराने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहिम राबविण्यात आली होती. शहरी आणि ग्रमीण भागात विविध उपक्रम घेऊन मतदारांमध्ये जागृती करण्यात आली होती. तरीही यावेळी मतदानाची टक्केवारी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही.
उन्हाच्या झळा आणि मतदारांमधील उदासीनता यामुळे कमी मतदान झाल्याचे बोलले जाते. पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आदींनी सभा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तरीही मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले नसल्याचे दिसते.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ 2019 2014 2009
वर्धा 61.18 64.77 54.55
रामटेक 62.12 62.70 50.56
नागपूर 54.74 57.12 43.57
भंडारा-गोंदिया 63.71 72.21 70.96
गडचिरोली-चिमूर 0000 69.65 65.04
चंद्रपूर 64.66 63.25 58.42
यवतमाळ-वाशिम 61.09 58.80 54.40
टीप : गडचिरोली-चिमूरची मतदानाची आकडेवारी उपलब्ध नाही

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.