Vijay Vadettiwar: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाची (Winter Session) तारीख जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. 7 तारखेपासून सुरू होणारे हे अधिवेशन 20 तारखेपर्यंत चालणार आहे. मात्र या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनावरुन नाराजी व्यक्त करत किमान 3 आठवडे हे अधिवेशन चालावे, अशी मागणी केली आहे.
पत्रकारशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “किमान तीन आठवडे हे अधिवेशन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सरकारने पळ काढला आहे. सरकार राज्यातील प्रश्नांबाबत गंभीर दिसत नाही. सरकार चर्चा नाही तर टाइमपास करायचा आहे.” दरम्यान, १९ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या विषयांवरुन अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढविण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अशी चर्चा सुरू झाली, की अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होईल. मात्र आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला होणार असल्याचे निश्चित झाले आहे.