नवी दिल्ली – महामार्गावर प्रवासावेळी टोल भरताना फास्टॅग वापराची पद्धत सरकारने सुरू केली आहे. अजूनही काही वाहनधारक या यंत्रणेचा वापर टाळतात. त्यामुळे सरकारने फास्टॅग वापरण्याचा आग्रह केला आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन या यंत्रणेचे वाहन पोर्टल्सशी संलग्नीकरण केले आहे. त्यामुळे फास्टॅग वापरासंदर्भातील सर्व डेटा वाहन पोर्टलवर उपलब्ध होत आहे. नागरिकांनी फास्टॅगचा वापर करावा याकरिता आता वाहन नोंदणीवेळी आणि वाहनाच्या नूतनीकरण परवाने घेताना फास्टॅगचा वापर किती केला आहे याची शहानिशा होणार आहे.
काही वाहनांच्या विक्री वेळीच फास्टॅग जोडला जातो. मात्र, नंतर नागरिक फास्टॅग बॅंक अकाउंटशी संलग्न करण्यास किंवा तो ऍक्टिव्हेट करण्यास टाळाटाळ करतात. देशातील वाहनांची संख्या, वाहनांची परिस्थिती या संदर्भात तपशिलात माहिती उपलब्ध व्हावी याकरिता फास्टॅगसंदर्भातील माहितीचा उपयोग होऊ शकणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी, त्याचबरोबर वाहतूक विषयक परिस्थिती सुधारण्यास मदत व्हावी याकरिता वाहनधारकांनी फास्टॅग वापरावे असे आवाहन करण्यात आले.