पॉझिटिव्ह रुग्णांची दिवसागणीक होतेय वाढ
जिल्ह्यात आज 90 करोनाबाधित; बाधितांची संख्या 963 वर
जिल्ह्यात आतापर्यंत 634 रुग्ण बरे होऊन परतले घरी
नगर (प्रतिनिधी) – करोना पॉझिटिव्ह रुग्णांत दिवसागणीक मोठी वाढ होत आहे. त्यामुळे शहरात करोनाचा सिलसिला सुरूच आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. प्रशासनाने सांगितलेल्या खबदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र याकडे नगरकरांचे दुर्लक्ष झाले असल्याने करोनाने एका दिवसात शंभरी गाठली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 963 वर पोहचली आहे.
जिल्ह्यात आज 66 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 634 इतकी झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढवून बाधित आढळलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या 23 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
तसेच आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 307 झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 963 इतकी झाली आहे. दरम्यान सायंकाळी आलेल्या अहवालात सहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये नगर शहरातील सर्जेपूरा येथील तीन, पाइपलाइन एक, नगर तालुक्यातील विळद येथे एक तसेच पाथर्डी तालुक्यात एक रुग्ण बाधित आला असून 193 व्यक्तींचे अहवला निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालनुसार बाधित आढळून आलेल्या 27 रुग्णांमध्ये नगर शहरातील 25, नेवासे व संगमनेर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, आज सकाळी करोना टेस्ट लॅबमध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या 47 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. नगर शहरात गुलमोहर रोड, आशा टॉकीज आणि सारसनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. विश्रांतवाडी (पुणे) येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 47 रुग्णांमध्ये नगर महापालिका क्षेत्रातील 34, कोपरगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी एक, पारनेर, श्रीरामपूर येथे दोन, राहाता येथे तीन, तर संगमनेरात चार बाधित आढळले आहेत. तसेच जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग कायम असून, त्या तुलनेत करोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. यात संगमनेरमधील तब्बल 35 जणांचा समावेश आहे. याशिवाय नगर शहर 16, श्रीगोंदे पाच, जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी दोन, अकोले, बीड, शेवगाव, नगर तालुक्यातील प्रत्येकी एक जणाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 634 झाली आहे.