नवी मुंबई – एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. यामुळे बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी सानपाड्यातील रहिवाशी आहे. या व्यक्तीला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यापाराचे नवी मुंबईतील धान्य मार्केटमध्ये धान्याचे दुकान आहे. या व्यापाराची आज करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याची ट्रव्हल हिस्ट्री तपासण्यात येणार आहे. तसेच तो किती वेळा बाजारात गेला? त्याशिवाय अन्य किती ठिकाणी त्याचा वावर होता याचा शोध आरोग्य अधिकारी घेत आहेत.
दरम्यान हा व्यापारी दोन ते तीन वेळा बाजारात आला होता, अशी माहिती काही व्यापारांनी दिली. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गुरुवारी धान्य मार्केटमध्ये डाळी आणि धान्य 300 ते 325 गाड्यांची आवक झाली. आज (17 एप्रिल) मुंबईतील काही कडधान्य पुरवठा करणारे व्यापारीही बाजारात वाहतुकीसाठी आले होते. मात्र धान्य मार्केटमधील व्यापाराला करोनाची लागण झाल्याचे समजताच जवळपास 80 टक्के व्यापारी बाजारातून निघून गेले. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईला कडधान्य पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.