अजित पवारांविरोधात स्थानिकापेक्षा आयात उमेदवाराला पसंती
प्रमोद ठोंबरे
बारामती- बारामती विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्याविरोधात भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत गोपीचंद पडळकर यांचे नाव समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार यांना हे तगडे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत बारामतीतील स्थानिक नेत्यांना डच्चू देत भाजपाने बारामतीसाठी आयात उमेदवाराला पसंती देणार असल्याची चर्चा आहे.
भाजपमधून वंचित बहुजन आघाडी व पुन्हा भाजपच्या कळपात सामील झालेले गोपीचंद पडळकर त्यांचे पुनर्वसन कुठे करायचे? असा प्रश्न भाजपला पडला होता. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. आरक्षणाची मागणी देखील जोरदार केली, त्यावेळी संपूर्ण राज्यातून धनगर समाजाचा पडळकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. वंचित बहुजन आघाडीमधून त्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवली त्यात त्यांना जवळपास तीन लाख मते मिळाली. ही बाब भाजपच्या लक्षात येताच त्यांनी पडळकर यांना भाजपच्या कळपात सामील करून घेतले.
बारामती विधानसभा मतदार संघ धनगर बहुल असल्याने गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे बोलले जात आहे. अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर सामना रंगणार असल्याचा विश्वास भाजप नेत्यांना आहे. 2019ची बारामती विधानसभा निवडणूक आम्ही जिंकू हा दावा हवेतील ठरेल असे वक्तव्य महसूलमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामती येथे केले होते. 2024 आमचे “टार्गेट’ आहे असे देखील पाटील यावेळी म्हणाले होते. राष्ट्रवादीला गाफील ठेवण्यासाठीच चंद्रकांत पाटील अशा प्रकारचे वक्तव्य करीत होते का? असा प्रश्न आत निर्माण होत आहे.
- स्थानिकांना डच्चू?
बारामती विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे संघटन पाहता महायुतीत बारामतीची जागा शिवसेनेकडे असली तरी देखील बारामतीतील भाजपाचे संघटन पाहता ही जागा भाजपच लढवणार हे उघड होते; परंतु उमेदवार आयात असेल याची किंचितही खबर भाजपतील स्थानिक नेते तसेच कार्यकर्त्यांना नव्हती, त्यामुळे भाजपाने स्थानिक नेत्यांसाठी देखील धक्का तंत्राचा वापर केल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नेते बाळासाहेब गावडे महानंदचे संचालक दिलीप खैरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्या नावाची भाजपमधून चर्चा आहे; मात्र या स्थानिक नेत्यांना डच्चू देत गोपीचंद पडळकर यांना बारामतीत उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्ष देईल उमेदवार स्वीकारून काम करण्याची तयारी या नेतेमंडळींनी दाखविली असली तरी देखील आयात उमेदवाराची “सल’ त्यांच्या मनात असणार हे नक्की.