Google Maps – गूगल मॅपचा (जीपीएस) (Google Maps) वापर सगळेच करतात कारण ते माहिती नसलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरत असते. मात्र याच गूगल मॅपचा उपयोग केरळमधील दोन डॉक्टरांच्या (doctors) जिवावर बेतला असून त्याला प्राणास मुकावे लागल्याची घटना घडली आहे.
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात कार नदीत कोसळून रविवारी दोन जणांचा मृत्यू झाला. अद्वैत आणि अजमल ही त्यांची नावे असून दोघे 29 वर्षांचे होते. पेशाने डॉक्टर असलेले हे दोघे आपल्या अन्य तीन मित्रांसह एका कार्यक्रमातून परत येत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक गूगल मॅपचा वापर करत तेथील निर्देशांचे पालन करत होता. नदीला पाणी साचलेला रस्ता समजून त्याने त्यानुसार कार पुढे नेली आणि कार पेरियार नदीत कोसळली. अपघात झाला तेंव्हा पाऊस पडत असल्यामुळे समोरचे स्पष्ट दिसत नव्हते.
तसेच पुढे नदी असल्याचे दर्शवणारे कोणते चिन्हही तेथे नव्हते आणि बॅरिकेटसही नव्हते. कार पाण्यात पडल्यानंतर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. तोपर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश मिळाले.
मात्र अन्य दोघांना ते वाचवू शकले नाहीत. मृत्यूमुखी पडलेले दोन्ही डॉक्टर कोडुंगल्लूरच्या एआर सुपर स्पेशालीटी इस्पितळातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये कार्यरत होते. कलम 174 नुसार अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.