पुणे – अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पुढील 3-4 दिवसांत येथे मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. दरम्यान, यावर्षी एल-निनो स्थिती लक्षात घेता, अशी स्थिती सक्रिय असण्याच्या वर्षी मान्सूनच्या आगमनाला उशीर होतो. त्यामुळे पाऊस यंदा केरळमध्ये चार दिवस उशिराने पोहचण्याचा अंदाज आहे.
कमी दाबाचा पट्टा शक्य
दरवर्षी साधारणपणे दि. 1 जूनला मोसमी वारे केरळच्या उंबरठ्यावर येतात. ही स्थिती देशात पावसाळ्यात अधिकृत सुरुवात मानली जाते. यंदा अंदमानात मान्सून वेळेतच दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, एल-निनोमुळे भारतीय दक्षिणेकडील समुद्रीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मान्सूनची वाटचाल संथ होऊ शकते. असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, 2022 मध्ये मान्सून 29 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता.
अंदमानात पोषक वातावरण
अंदमान, निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
तर, पुढील 3 ते 4 दिवसांत दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचे वेळापत्रक पाहता, दरवर्षी मान्सून साधारण 22 मेच्या दरम्यान अंदमानात दाखल होतो. आताही तशा हालचाली आहेत.
मान्सून आला,हे कसे ठरवतात?
केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये हवामान विभागाने 8 ठिकाणी निरीक्षण केंद्र उभारली आहेत. या स्थानकांवर सलग दोन दिवस किमान 2.5 मिमी पाऊस पडतो, तेव्हा मान्सूनचे देशात आगमन झाल्याचे घोषित केले जाते.
अर्थव्यवस्थेवर परिणाम
नैऋत्य मोसमी पावसात देशातील वार्षिक 70% पाऊस पडतो. आजही आपल्या देशातील 80 टक्के शेतकरी सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे उत्पादन पूर्णपणे चांगल्या पावसावर अवलंबून असते. समाधानकारक पाऊस झाला नाही, की महागाईही वाढते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही मान्सूनचे विशेष असे महत्त्व आहे.