वॉशिंग्टन – ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मर्कल या राजदाम्पत्याकडे दुसऱ्यांदा “गुड न्यूज’ आहे, अशी माहिती या दाम्पत्याच्या प्रवक्त्याने रविवारी दिली आहे. “या दाम्पत्याचा पहिला मुलगा आर्ची हा लवकरच थोरला भाऊ होणार आहे. ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना आपल्या दुसऱ्या अपत्याची चाहुल लागली आहे.’ असे या प्रवक्त्याने सांगितले.
आर्ची यावर्षी मे महिन्यात 2 वर्षांचा होणार आहे. राजघराण्याचा तो सातवा वारसदार आहे. त्याच्याच नावावरून हॅरी आणि मेघन मर्कल यांनी आपल्या स्वयंसेवी संस्थेचेही नाव “आर्चवेल’ असे ठेवले आहे. गेल्या उन्हाळ्यात मेघन मर्कल यांचा अचानक गर्भपात झाला होता. मेघन मर्कल यांनीच स्वतः न्यूयॉर्कमधील एका वर्तमानपत्राच्या संपादकीय लेखामध्ये याबद्दलची माहिती दिली होती. या गर्भपातामुळे आपण आणि हॅरी अधिक जवळ आलो आहोत, असे त्या म्हणाल्या होत्या. लोकांनीही सहानुभुतीपूर्वक या घटनेचा स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले होते.
गेल्या वर्षी राजघराण्याचे ख्रिसमसचे शुभेच्छा कार्ड सोशल मिडीयावर शेअर केले गेले होते. त्यामध्ये प्रिन्स हॅरी, मर्कल, आर्ची आणि कुत्र्याची दोन लहान पिल्लांचाही फोटो होता.
प्रिन्स हॅरी आणि मर्कल यांनी गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच ब्रिटीश राजघराण्यातील आपले सर्व अधिकार, पद आणि सन्मान सोडून दिले आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात या राजदाम्पत्याने कॅलिफोर्नियातील सॅन्टा बार्बरा इथे वास्तव्य केले.