नवी दिल्ली – पोलिसांनी ग्रेटा थनबर्गच्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या ट्विटमधील टूलकीट प्रकरणात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी आणखी दोन कार्यकर्त्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, निकीता जेकब आणि शंतनू या दोघांविरोधात आम्ही अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. विशेष शाखेच्या सायबर युनीटला टुलकीट प्रकरणात त्यांचा सहभाग आढळला आहे. आम्ही त्यांना लवकरच अटक करू.
वकील असणाऱ्या जेकब यांनी चार आठवड्यांच्या प्रवासी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायलयात अर्ज केला आहे. त्यांनी पोलिसांनी कोणतीही कारवाई करण्यापासून अंतरीम संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे. तिने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालाची प्रतही मागितली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.
हे दोघे कागदपत्रे तयार करण्यात सहभागी होते. खलिस्तानवादी घटकांच्या ते थेट संपर्कात होते. ही कागदपत्रे तयार करणाऱ्यांच्या ते निकटच्या संपर्कात होते, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला आहे.
दिशा रवी यांच्या अटकेनंतर संताप व्यक्त होत असताना ही वॉरंट काढण्यात आली आहेत. दिशा यांना न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायदंडाधिकारी देव सरोहा यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर दिशा अक्षरश: रडली आणि तिने न्यायालयाला सांगितले, कोणत्याही कटाचा किंवा गटात माझा कोणताही सहभाग नाही. मी केवळ शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे…. कारण, ते आमचे भविष्य आहेत.
आपल्याला खाण्यासाठी गरजेचे असणारे अन्न ते आपल्याला पुरवतात. मी कोणतेही टूलकिट तयार केले नाही. मी त्या कागदपत्रात केवळ दोन किरकोळ बदल केले आहेत. दिशा रवी यांच्या अटकेवर विरोधक आणि संयुक्त किसान मोर्चाने तीव्र संताप व्यक्त करत तिच्या तातडीने विनाशर्त सुटकेची मागणी केली आहे.