मंचर (प्रतिनिधी) – बँकेत येणाऱ्या ग्राहकाशी कर्मचारी बांधवांनी संवाद साधून त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला सहकार्य केल्यास बँक आणि ग्राहकाचे नातं अतूट होईल .असे मत मंचर येथील शरद सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले.
मंचर (ता.आंबेगाव) येथील शरद सहकारी बँकेतील सेवक प्रशिक्षण व स्नेह मेळावा कार्यक्रम खेड घाटातील हॉटेल मोक्ष येथे संपन्न झाला. यावेळी बँकिंग क्षेत्राबाबत विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दनाईत यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दूरगामी वाटचालीचे नियोजन, अॅड. जयश्री नांगरे यांनी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस, मीडिया विद्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य कुलकर्णी यांनी सोशल मीडिया मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी बँकेची आर्थिक प्रगती केल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सन्मान बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आला.
व्यवसायाचे नियोजन, पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी चहापाणी होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दणाईत, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, संचालक शिवाजी लोंढे, अजय घुले, अशोक आदक, संतोष धुमाळ यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खेड घाट येथे मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकिंग प्रशिक्षण कार्यक्रमात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.