Gold Smuggling – महसूल गुप्तचर संचालनालयाने अर्थात “डीआरआय’ने परदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. दिनांक 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी “डीआरआय’च्या पथकांनी अतिशय काळजीपूर्वक,नियोजित आणि सुव्यवस्थितपणे केल्या गेलेल्या या कारवाईत 31.7 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले.
या सोन्याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित कारवाई करून, नागपूर “डीआरआय’च्या पथकाने सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करणाऱ्या दोन जणांना कोलकाताहून निघालेल्या रेल्वेमधून नागपूर रेल्वे स्थानकावर उतरताना पकडले.
त्यांच्याकडून 8.5 किलो वजनाचे विदेशी चिन्हांकित सोने जप्त करण्यात आले. या तस्करांच्या चौकशीनंतर “डीआरआय’च्या पथकाने तस्करीच्या सोन्याच्या दोन खरेदीदारांची ओळख पटवून त्यांना सुद्धा ताब्यात घेतले.
वाराणसी येथील “डीआरआय’च्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर 3 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलातील शोध मोहिमेनंतर वाहनासह दोन आरोपींना पकडण्यात यश मिळविले. त्या दोघांकडून आणि कारच्या हॅंडब्रेकच्या खाली बनवलेल्या पोकळीतून सुमारे 18.2 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
आणखी एका कारवाईत वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन गेलेल्या पाच आरोपींना शोधण्यात मुंबईच्या पथकाला यश आले. या पथकाने त्यांच्याकडून 4.9 किलोग्रॅम सोने जप्त केले. ही टोळी बांगलादेशच्या सीमेवरून भारतात सोन्याची तस्करी करत असे आणि पुढे ते मुंबई, नागपूर, वाराणसी शहरांकडे ते सोने विक्रीसाठी पाठवले जायचे, असे या आरोपींच्या चौकशीत असे उघड झाले.
“डीआरआय’ने मुंबईत पाच, वाराणसीत दोन आणि नागपुरमध्ये चार अशा एकूण 11 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले लोक सोन्याच्या तस्करी करणाऱ्या टोळीच्या सर्व स्तरावरील म्हणजे वाहक/प्रवासी, हॅंडलर आणि तस्करीच्या सोन्याचे अंतिम प्राप्तकर्ते अशा सर्व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहेत.