Gold -Silver Price – जगात दोन युद्ध चालू असतानाच आखातामध्ये व्यापारावर परिणाम झाला आहे. इतर अनेक देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत बरेच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर रोज नव्या विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहेत.
जागतिक बाजारात सोन्याचा आणि चांदीचा दर वाढला. त्यामुळे दिल्ली सराफात सोन्याचा दर 350 रुपयांनी वाढून 71,700 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला आहे. दिल्ली सराफत चांदीचा दरही 800 रुपयांनी वाढून 84हजार रुपये प्रत्येक किलो या पातळीवर गेला आहे.
भारतामध्ये गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी कमी प्रमाणात केली जाते. तर भारतात दागिन्यासाठी सोन्याची खरेदी जास्त केली जाते. सध्या सोने आणि चांदीचे दर इतक्या उच्च पातळीवर असल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना दागिने खरेदी करण्यासाठी सोने खरेदी करणे अवघड होत चालले आहे.
अशा परिस्थितीत गुढीपाडवा येत आहे. मात्र तरीही भारतात गुढीपाडव्याला प्रतिकात्मक सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये भारतात सोन्याचे दर 7,700 रुपयांनी वाढले आहेत.
जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढत असल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या किमती वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,336 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. तर जागतिक बाजारात चांदीचा दर 27.45 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. अनेक देशाच्या रिझव्हर्र् बँकांनी सोने खरेदी करणे चालूच ठेवले आहे. दरम्यानच्या काळामध्ये बर्याच रिझर्व्ह बँका सोने खरेदी करीत असल्यामुळे दर वाढत आहेत.