मुंबई – बंधन बँकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष यांनी सध्याची मुदत संपल्यानंतर पदभार सोडण्याचे संकेत गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर बंधन बँकेचा शेअरचा भाव आज सकाळी साडेसहा टक्क्यांनी कोसळून 184 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. (Bandhan Bank shares fell)
यामुळे कंपनीचे बाजार मूल्य 2,000 कोटी रुपयांनी कमी होऊन 29,794 कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या आठवड्यात या बँकेने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले होते की, सध्या बँकेत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून घोष कार्यरत आहेत. त्यांचा कालावधी 9 जुलै 2024 रोजी संपणार आहे. त्याप्रमाणे ते आपला पदभार सोडणार आहे.
घोष यांनी यासंदर्भात संचालक मंडळाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपण गेल्या दहा वर्षापासून बँकेचे कार्यकारी नेतृत्व करत आहोत. मात्र आगामी काळात कार्यकारी पदाऐवजी वेगळी भूमिका अदा करण्याची इच्छा आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूत्रानुसार कुठल्याही बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ या पदावर काम करता येत नाही. बंधन बँकेची स्थापना 23 ऑगस्ट 2015 रोजी झाली होती. आता बँकेच्या 501 शाखा 50 एटीएम आहेत. या बँकेचे कामकाज 24 राज्यात चालते. 2018 मध्ये बंधन बँकेची शेअर बाजारावर नोंदणी झाली होती.