Gold Silver Price: सोन्याच्या दरात वाढ तर चांदीत घसरण; वाचा नेमके किती रुपयांनी महागले सोने?

मुंबई : गेले काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना पहायला मिळतंय. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद होताना मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात 640 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 1800 रुपयांची घसरण झाल्याचे पहायला मिळाले. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,620 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,620 रुपये इतका आहे.

चांदीच्या दरात मात्र तब्बल 1800 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता 63,900 रुपये मोजावे लागणार आहेत. सोमवारी हा दर 65,700 इतका होता. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तो आज 65,700 रुपये इतका झाला आहे.

गेल्या दहा दिवसांचा विचार करता केवळ 24 तारखेला सोन्याची किंमत 1020 रुपयांनी वाढली होती त्यानंतर काल 640 रुपयांची वाढ झाली आहे. अन्यथा इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाली आहे. गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता. मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्याने होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 12 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.