लस आल्यामुळे “करोना’ची भीती संपली; केंद्रिय आरोग्य मंत्री

यातूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहेत

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत एका महिन्यात मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण अचानक कसे वाढले? याचे उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहे. कोरोनावरील लस आली आहे. आता सर्व काही ठीक होईल, असे नागरिकांना वाटत आहे. नागरिकांना आता कोरोना या संसर्गाचे गांभीर्य राहिलेले नाही. लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला आहे. ते सहजतेने घेत आहेत. यातूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहे, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोरोनावरील लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणं ही दुर्मिळ घटना आहे. पण कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असेल तर जीवाला असलेला धोका कमी असतो. सर्व परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्याची प्रक्रिया आता निश्‍चित झाली आहे.
सरकारने मंजुरी दिलेल्या दोन्ही लसी( कोविशिल्ड, कोवॅक्सिन) सुरक्षित आणि प्रभावी आहेत. या लसींचे डोस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. तरीही अनेकांना या लसींवर संशय आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून फॉरवर्ड झालेल्या कुठल्याही मेसेजवर विश्‍वास ठेवू नका, लसीकरणासाठी पुढे या, असे आवाहन त्यांनी केले.

टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट हे अत्यंत गरजेचे आहे. ट्रॅकनंतर आयसोलेशन आणि ट्रीटमेंट गरजेची आहे. कोरोना लढाईविरोधात सरकारने 20 लाख बेड बनवले आहेत. भारत सरकार कोरोनाची सर्व प्रकरणे गंभीरतेने घेत आहे. गेल्या आठवड्यात 47 जिल्ह्यांसोबत बैठक झाली होती. आज सकाळी 430 जिल्ह्यांत 7,14,21 किंवा 28 दिवसांत रुग्ण आढळून आलेले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.

आणखी जवळपास कोरोनावरील 7 लसींची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे तर दोन डझन लसी प्री क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. सर्व राज्यांना 17 जानेवारी 2020 पासून मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. पंतप्रधान, कॅबिनेट सचिव हे राज्यांच्या मुख्य सचिव किंवा आरोग्यमंत्र्यांशी सतत संवाद साधत आहेत. कोविन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे.

आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना 50 हजार केंद्रांवर लसीकरण केले जाईल. आतापर्यंत यासाठी मोठ्या संख्येत नोंदणी झाली आहे. लसीकरणासाठी केंद्रावरही नोंदणी करता येऊ शकते. कोरोनासंबंधीचे वर्तन आणि लसीकरणासाठी थोडा वेळ दिल्यास आपल्याला कोरोनावर विजय मिळवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.