कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे शनिवारपासून फुल क्रिम दूध एक लिटरसाठी 58 रुपये, तर अर्धा लिटरसाठी 29 रुपये असे सुधारित दर असणार आहेत. सध्या एक लिटर दूध 54 रुपये, तर अर्धा लिटर दुधाचा दरहा 27 रुपये होता.
यासंदर्भात गोकुळच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गोकुळ दूध संघमार्फत नुकतेच दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. दूध उत्पादकांना दिलेला जादा दर, वाहतूक खर्च या पार्श्वभूमीवर गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
शनिवारपासून नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे . कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये फुल क्रिम दुधासाठी आता ग्राहकांना लिटरमागे चार तर अर्धा लिटरमागे दोन रुपये जादा द्यावे लागणार आहेत.
नवीन दराची पॉलिफिल्म उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराच्या पॉलिफिल्ममधून दुधाचा पुरवठा करण्यात येईल. दरम्यान गोकुळ ब्रॅंण्डच्या फुल क्रिम दूध (200 मिली पॅक) प्रमाणित, गाय व टोण्ड दुधाच्या विक्री दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.