पिपंरी (प्रतिनिधी) – मैत्रिण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून एका तरुणाचे अपहरण करून त्यास दगडाने ठेचून ठार मारण्यात आल्याची अत्यंत दुर्देवी आणि तितकीच भयंकर घटना मंगळवारी (दि. 12) रात्री मोशी येथे घडली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत दहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी चारजण अल्पवयीन आहेत.
कृष्णा रेळेकर (वय 18, रा. मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पिसे याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास शिवाजीवाडी, मोशी येथील एका दुकानाच्या बाहेरून कृष्णा याचे अपहरण करण्यात आले. याबाबत त्याच्या आईला माहिती मिळताच तिने कृष्णाला शोधण्याचा प्रयत्न केला. सकाळी एका महिलेने कृष्णा यांच्या आईला संशयित आरोपींबाबत महत्वाची माहिती दिली. कृष्णाचा शोध न लागल्याने त्याच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी दोन आरोपी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कृष्णा याला गाडीवर बसवून नेताना दिसून आले. त्यानंतर त्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दहा जणांनी कृष्णा याचे अपहरण करून त्यास दगडाने मारहाण करून खून केल्याची कबुली दिली. तसेच त्याचा मृतदेह शेल पिंपळगाव येथील नदीत टाकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकाला अटक करण्यात आले असून इतर चार आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू आहे.
सर्व आरोपींची एक कॉमन मैत्रीण असून सध्या ती इतरांशी न बोलता केवळ कृष्णा याच्याशी बोलत असल्याचा राग आरोपींच्या मनात होता. तसेच यापूर्वी त्यांच्यात इतर कारणावरून वादही झाले होते. यावरून मंगळवारी दुपारी कृष्णा याने एका अल्पवयीन मुलास मारले होते. त्या मुलाने इतर आरोपींना याबाबत सांगून रात्री कृष्णा हा त्या मुलीला भेटण्यासाठी येणार असल्याचीही माहिती दिली. यामुळे सर्व आरोपींनी आपसांत संगनमत करून कृष्णा याचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. अल्पवयीन मुलांनी केलेल्या कृत्यामुळे मोशी परिसर हादरला असून अत्यंत शुल्लक कारणामुळे घडलेल्या या घटनेची चर्चा परिसरात सुरू आहे.