सातारा, (प्रतिनिधी) – येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे शुल्क वाढवण्यात आल्याने जलतरणपटू मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे . सातारकरांना प्रतिव्यक्ती 2200 रुपये मोजण्याची वेळ आल्यामुळे बाळगोपाळांना पालिकेच्या भवानी तलावाची आठवण येत आहे. जलतरण तलावाच्या सुविधा साधारण दर्जाच्या असताना ठेका तत्त्वावर दिलेला जलतरण तलाव सध्या वादावादीचे केंद्र बनला आहे.
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधा या सर्वसामान्य सातारकर यांच्या वाट्याला येताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. सातारा शहरांमध्ये उन्हाळ्यात पोहण्याची हौस भागवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. काही वर्षांपूर्वी सातारा पालिकेचा भवानी तलाव उपलब्ध होता. मात्र पालिकेने त्याच्या अद्ययावतीकरणास नकार देऊन भवानी तलावाची शोभा घालवली आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हा एके ग्रुप या पुणे येथील ठेका कंपनीला ठेका तत्त्वावर देण्यात आला आहे. सध्या येथे पाच बॅचेस वेगवेगळ्या वयोगटासाठी चालतात.
मात्र गत वेळेला असणारे पंधराशे रुपये शुल्क आता 2200 रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे सातारकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. सातारकरांना अल्प दरामध्ये जलतरणाची सुविधा मिळावी, अशी मागणी होती तशी अनेक निवेदने जिल्हा क्रीडाअधिकारी नितीन तारळकर यांना प्राप्त सुद्धा झाली होती. मात्र जलतरण तलाव ठेका तत्त्वावर देण्यात आल्याने ठेकेदार ठरवेल ती फी असा नियम झाला आहे. परिणामी सर्वसामान्य घरातील बच्चे कंपन्यांना उन्हाळ्यामध्ये पोहोण्याच्या आवडीला मुरड घालावी लागत आहे.
सातारा शहरा लगतच्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असणारे धरण क्षेत्र, विहिरी, तलाव येथे तरुण वर्ग पोहायला जात असून त्यामध्ये पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या अपघाती घटना घडत आहे. कालच उरमोडी धरण क्षेत्रात 17 वर्षीय मुंबई येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी सातारा शहरांमध्ये खाजगी जलतरण तलाव होता. मात्र विकसनाच्या नावाखाली तोही बंद करण्यात आला.
पुणे-मुंबईच्या मानाने शुल्क अत्यल्प
सातारा शहरात शाहू स्टेडियममधील एकच जलतरण तलाव उपलब्ध आहे. मात्र त्याची फी सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ठेका घेणारी कंपनी ही पुण्याची आहे.
एके ग्रुप असे या कंपनीचे नाव आहे. पुणे-मुंबई येथील जलतरण तलाव शुल्क दराच्या तुलनेने येथील शुल्क अत्यल्प आहे. तसेच तलावासाठी करावे लागणारे फिल्टरेशन त्याची देखभाल आणि प्रशिक्षकांचे मानधन यातूनच सर्व खर्च भागवायचा आहे. याचा विचार करून फी मध्ये ही वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.