इंदूर : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी नुकतेच महिलांच्या पेहरावावर खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आजकालच्या मुलींची तुलना शूर्पणखाशी केली आहे. मात्र त्यांच्या या विधानाचे समर्थन चक्क आता मध्य प्रदेशच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनीही केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, ‘आम्ही महिलांना देवी मानतो, पण मुली असे अश्लील कपडे घालतात, ज्यामध्ये त्या ‘शूर्पणखा’ (लंका राजा रावणाची बहीण) सारख्या दिसतात. यासोबतच तरुणांमध्ये वाढत्या नशेच्या प्रवृत्तीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर त्यांच्या या वक्तव्यावर उषा ठाकूर यांनी ,”जर कोणी वैदिक सनातन परंपरेचे पालन करत नसेल, तर त्या व्यक्तीला राक्षस प्रवृत्ती आहे असे म्हटले जाईल.”असे म्हणत विजयवर्गी यांच्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.
तर दुसरीकडे कैलाश विजयवर्गी यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विभा पटेल म्हणाल्या, सत्तेच्या गर्वाने भाजप प्रतिष्ठा विसरत आहे. पटेल म्हणाल्या, “विजयवर्गीय कोणत्या जगात जगत आहेत? आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा, खाण्याचा आणि पिण्याचा अधिकार आहे. जर महिला त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर करत असतील तर नक्कीच त्यात मर्यादा हव्याच, पण नेत्यांनी कोणतीही टिप्पणी करण्याआधी आपली शिष्टाई जपावी.
भाजपच्या प्रवक्त्या नेहा बग्गा म्हणाल्या, “कैलाश विजयवर्गीय यांनी जे सांगितले ते समाजाच्या चिंतेचे आणि पालकांच्या चिंतेचे कारण आहे. काही वेळा मुलांना समजावण्यासाठी अशा भाषेचा वापर केला जातो आणि मला वाटते की, त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्या.