पुणे – मागील अनेक वर्षांपासून करोनाचे संकट असताना त्यात अनेकवेळा स्पर्धा परीक्षेत एकामागून एक असे पेपरफुटी, पेपर मॅनेज प्रकरण घडत आहेत, त्यातच अलिकडेच आरोग्य विभाग भरती गट-क मधील काही पेपर लीक झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पण ५२ पैकी कोणते पद आणि कोणत्या सत्रातील पेपर लीक झाला हे न कळाल्याने उर्वरीत पदांचा निकाल किती दिवस रोखून ठेवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य विभाग गट क ५२ संवर्गासाठी २७०० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी राज्यात २४ ऑक्टेबर २०२१ रोजी २ सत्रात परीक्षा पार पडली. परंतु ५२ पैकी कोणत्या पदाचा आणि सत्राचा पेपर लीक झाला आहे हे अद्याप तरी पोलीसांनी उघड केले नाही.
या परीक्षेत बहुसंख्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा विचार करता ते सामान्य गुण असल्याचे २४ नोव्हेंबर रोजीच्या गुणांच्या यादीवरून लक्षात येते. संबंधित विद्यार्थ्यांनी या संबंधिचे निवेदन त्या विभागाला नुकतेच दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन संबंधित विभागाचा निकाल जाहीर करावा असे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं आहे.
पोलीस तपासांती ज्या पदाचा पेपर लीक झाला हे सिध्द होईल, त्यांची परत परीक्षा घ्यावी. परंतु ज्या पदांचा पेपर लीक झाला नाही किंवा पोलिसांनी अजूनही तसे सांगितले नाही. अशा पदांचा निकाल लावून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. हे विद्यार्थी कुठल्याही पोलीस चौकशीस देखील यांची तयारी आहते. पोलीस अहवाल मागवतांना ५२ पैकी कुठल्या पदाचा पेपर लीक झाला आहे हे सविस्तरपणे मागवावे अशी पण मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.