कोंढवा – येवलेवाडी येथे संथगतीने सुरू असलेल्या मुख्य रस्त्यातील ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण करा नाहीतर ते बंद तरी करा, आम्ही ते पूर्ण करू, अशा स्पष्ट शब्दांत पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी महापालिकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कामठे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण येवलेवाडी नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करीत मनपा प्रशासनाला आंदोलनाचा दणका देण्यात आला. पुणे मनपा मल:निसारण कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव यांनी निवेदन स्वीकारत सदर काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
खडीमशीन चौक येवलेवाडी या रस्त्यावर सहा महिन्यांपासून ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. येवलेवाडीच्या चौकामध्ये मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. सदर कामाच्या ठिकाणी माहिती फलक नाही तसेच सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. हा रस्ता सासवड-नीरा-फलटण या रस्त्यांना जोडणारा आहे, तरीही या रस्त्याचे काम पूर्ण संथगतीने सुरू आहे. याबाबत संबंधीत विभागास निवेदने देण्यात आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
अखेर, भाजपचे नेते जालींदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली येवलेवाडी नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय नागरिकांनी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माजी सरपंच विठ्ठलराव कामठे, दादासाहेब कामठे, संदीप धांडेकर, प्रवीण कामठे, संदीप बधे, गणेश कामठे, कैलास ठोसर, स्वाती चिटणीस, सुवर्णा गोरे, संभाजी कामठे, अरुण कामठे, जालिंदर निंबाळकर, प्रकाश पाटील, नितीन कामठे तसेच येवलेवाडीतील नागरिक सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.