बारामती – करोनावर जोपर्यंत प्रभावी लस मिळत नाही तोपर्यंत करोना बरोबर लढायचे आहे, त्यामुळे स्वतःला समाजात मिसळताना करोना बरोबर लढाईची सवय ठेवा, असे प्रतिपादन बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले. देसाई इस्टेटमधील श्री गणेश तरुण मंडळच्या वतीने करोना योद्ध्यांचा सन्मान व नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप प्रसंगी करोना सोल्जर्सला मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.
याप्रसंगी नगरपरिषदच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, स्थानिक नगरसेवक इम्तियाज शिकीलकर, छगन आटोळे, हेमंत नवसारे, बाळासाहेब वायसे आदी मान्यवर उपस्तीत होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर सोशल डिस्टनिगचे नियम पाळून व्यवहार करा, असेही औदुंबर पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी ,कर्मचारी व आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे ,आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व 100 सफाई कर्मचाऱ्यांचा मास्क व सॅनिटायझर देऊन सन्मान करण्यात आला.