भोर – भोरच्या एसटी आगारात मेडीकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने प्रशासन व लोकप्रतिनिधींचे सहकार्याने मोफत सुरु केलेल्या फ्ल्यूू क्लिनिकचा फायदा घेऊन करोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे.
भोरमधील खासगी वैद्यकिय सेवा देणाऱ्या संघटनेतर्फे प्रशासनाच्या सहकार्याने भोर बसस्थानकात मोफत फ्ल्यू क्लिनिक सुरु केले असून, त्याचे उद्घाटन आमदार थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी भोर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक दत्तात्रय बामणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, पोलीस निरीक्षक राजू मोरे, डॉ. अमित शेठ यांच्यासह भोरमधील खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स उपस्थित होते.
डॉ. अरुण बुरांडे यांनी म्हणाले की, लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत दररोज एक या प्रमाणे भोर शहरातील एक डॉक्टर लोकांची आरोग्य तपासणी करणार असून तालुका वैद्यकिय अधिकारी याकामी मदतनिस म्हणून आरोग्य कर्मचारी पुरवणार आहेत.
रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असून औषध विक्रेता संघटना सवलतीच्या दरात रुग्णांस औषध पुरवठा करणार आहे. जास्तीत जास्त औषधे ही उपजिल्हा रुग्णालय पुरवणार आहे. करोनाला घाबरुन न जाता किरकोळ आजारात या क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.