जामखेड -जामखेड येथील करोनाबाधितांच्या संपर्कातील एका नगरसेवकासह 18 जण व पूर्वी पाठविलेल्या नऊमधील डॉक्टरसह सात, अशा एकूण 25 जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जामखेडसाठी ही दिलासादायक बाब असून, या सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव पुढील चौदा दिवस चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
जामखेड येथील एका व्यक्तीचा सहा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्या मृत रुग्णाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेले त्याचे 29 आणि 35 वर्षीय मुलांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली होती. या दोन करोना पॉझिटिव्ह रुग्णांकडे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता, शहरातील एकूण 25 व्यक्तींच्या संपर्कात आले आसल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर तातडीने कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी बाधितांच्या संपर्कात आलेल्या 25 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना तपासणी करण्यासाठी 20 एप्रिल रोजी रात्री नगर येथे पाठवले होते. या 25 व्यक्तींमध्ये एक नगरसेवकाचा देखील समावेश होता.
आज करोनाबाधितांच्या संपर्कातील एका नगरसेवकासह 18 जण व पूर्वीच्या नऊ संशयितांमधील डॉक्टरसह सात, अशा एकूण 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत शहरातील एकाही व्यक्तीचा अहवाल पेंडिंग नाही. आतापर्यंत जामखेड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा झाली होती. त्यातील चार जणांचे अहवाल 19 एप्रिल रोजी निगेटिव्ह आले होते. त्यामुळे सध्या शहरात दोनच करोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 25 जणांना जामखेड शहर हॉटस्पॉट घोषित केले असल्याने जामखेडला न आणता चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील 15 दिवस क्वॉरंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली.